Ad will apear here
Next
चीनमधील इंटरनेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या, बहुराष्ट्रीय BAT कंपन्या


‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’
 या सदराचा १८वा भाग..... 

.........
अलिबाबा या चिनी कंपनीने पेटीएम कंपनीमध्ये ४०० दशलक्ष डॉलर इतकी रक्कम गुंतवली. टेन्सेंट कंपनीने फ्लिपकार्ट आणि ओला या कंपन्यांमध्ये ७०० दशलक्ष डॉलर गुंतवले. अशा गुंतवणुकीच्या बातम्या अनेकदा आपल्या कानावर पडत असतात. २०२०मधील आकडेवारीनुसार, भारतातील परकीय थेट गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) चिनी गुंतवणूक दोन अब्ज डॉलरहून अधिक आहे. एकंदर स्थितीचा आढावा घेता, भारतीय मंडळी रोज वापरत असलेल्या निरनिराळ्या अॅपपैकी जवळजवळ ८० टक्के अॅपमध्ये चिनी गुंतवणूक आहे. ओला, उबर, झोमॅटो, ड्रीम११, पेटीएम, स्नॅपडील यांसारख्या अनेक कंपन्या चिनी गुंतवणुकीवर चालत आलेल्या आहेत. परंतु, सर्वसामान्य भारतीय नागरिकाला या चिनी गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसते. यामध्ये प्रामुख्याने BAT कंपन्या सहभागी आहेत. BAT कंपन्या म्हणजे B – Baidu (पायतू), A – Alibaba (अलिबाबा) आणि T – Tenscent (टेन्सेंट).

पायतू थिएपा
पायतूला चिनी गुगल असे म्हणतात. चीनमध्ये गुगल आणि फेसबुक यावर बंदी आहे. त्यामुळे गुगल आणि फेसबुक यांच्या इतर उत्पादनांचा (अॅपचा) वापर करण्यावरही बंदी घातण्यात आलेली आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम यांसारखी जगभर लोकप्रिय असलेली अॅप चीनमध्ये वापरता येत नाहीत; पण त्यामुळे चिनी लोकांचे काही अडतेय, असे मात्र अजिबात नाही. या अॅपवरील निर्बंधांमुळे चिनी मंडळींना काहीही फरक पडत नाही. पायतूने गुगलला सडेतोड उत्तर देईल, असे सर्च इंजिन २००३मध्ये बाजारात आणले. तीन डिसेंबर २००३ रोजी सुरू झालेल्या पायतूच्या या सेवेने २०१५ या वर्षामध्ये दरमहा ३०० दशलक्षहून अधिक सबस्क्रायबर्सचा मैलाचा टप्पा पार केला. अवघ्या १७ वर्षांच्या या प्रवासात पायतूने १.५ अब्ज युजर्सची संख्या ओलांडली आहे. रॉबिन ली याने सन २०००मध्ये स्थापन केलेली पायतू ही कंपनी पाच ऑगस्ट २००० रोजी ‘नॅस्डॅक’मध्ये सूचिबद्ध झाली. 

जॅक माअलिबाबा समूह
जॅक मा हे नाव असंख्य जणांना माहीत असेल. जॅक मा आणि अलिबाबा हे घट्ट समीकरण आहे. जॅक मा २०१९पर्यंत चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होते. तरुण असताना मा यांना तब्बल ५६ नोकऱ्यांमध्ये नाकारण्यात आले. ‘केएफसी’मधूनही नकार मिळाल्यानंतर नशीब आजमावण्यासाठी मा अमेरिकेला गेले आणि परत येताना इंटरनेटची मोठी भेट घेऊन आले. चीनमधील इंटरनेट व तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे जॅक मा आज जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेतच. परंतु ‘जगातील सर्वांत प्रभावशाली पुरुष’ या यादीतही त्यांची गणना होते. चार एप्रिल १९९९ रोजी, म्हणजे अवघ्या २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कंपनीने आज यशाचे शिखर गाठले आहे. 

बी२बी – बिझनेस टू बिझनेस, बी२सी – बिझनेस टू कन्झ्युमर आणि सी२सी –कन्झ्युमर टू कन्झ्युमर अशा तीनही पर्यायांमध्ये काम करणारी अलिबाबा ही जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. या तीन पर्यायांमध्ये कार्यरत असणाऱ्या अलिबाबा समूहाच्या कंपन्या अनुक्रमे अलिबाबा.कॉम, टीमॉल आणि थावपाव या आहेत. 

सिंगल्स डे
चीनमध्ये ११/११ म्हणजेच ११ नोव्हेंबर या दिवसाला सिंगल्स डे असे म्हणतात. तिथल्या बोलीभाषेत १ हा आकडा अविवाहितांचे प्रतीक समजला जातो. या प्रथेचा योग्य वापर करून घेऊन अलिबाबाने सिंगल्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी ‘अलिबाबा’वरील बहुतांश वस्तूंवर भरपूर सवलत दिली जाते. २०१५मध्ये साजऱ्या करण्यात आलेल्या ‘सिंगल्स डे’च्या आकडेवारीनुसार, वॉलमार्ट, अॅमेझॉन व ई-बे यावर एका दिवसात जेवढी खरेदी होते, त्याहून जास्त खरेदी एकट्या ‘अलिबाबा’वर झाली. हा आकडा दर वर्षी वाढतोच आहे. २०१८मधील ‘सिंगल्स डे’ला जगातील सर्वांत मोठा ऑनलाइन व ऑफलाइन खरेदीचा दिवस असे म्हटले जाते.

अलिबाबा समूह ई-कॉमर्सव्यतिरिक्त अन्यही अनेक व्यवसायांमध्ये पाय रोवून उभा आहे. हे व्यवसाय आहेत – क्लाउड कम्प्युटिंग (अली क्लाउड), 168.कॉम, अलिपे, टीव्ही शोज, मोबाइल कॉमर्स, अली ओएस, एलिएक्स्प्रेस, पेटीएम. 

टेन्सेंट
ही कंपनी टेन्सेंट या नावाने ओळखली जात असली, तरी तिचे संपूर्ण नाव टेन्सेंट होल्डिंग्स लिमिटेड असे आहे. भारतात पबजीचे निर्माते म्हणून लोकप्रिय असलेली ही कंपनी चीनमधली सर्वांत मोठी आणि महत्त्वाची कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. मा हुआथंग यांनी १९९८मध्ये सुरू केलेली टेन्सेंट ही जगातील बलाढ्य कंपन्यांच्या यादीतील एक आहे. २०१९-२०मधील याद्यांनुसार, टेन्सेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत, तर या कंपनीचे मूल्य ९५.८८८ अब्ज आरएमबी इतके आहे. 



चिनी माणूस जेवढी अॅप्स वापरतो त्यापैकी ९० टक्के अॅप ही टेन्सेंटची आहेत. उदा. वीचॅट, क्यूक्यू मेल, क्यूक्यू साँग्स, एपिक गेम्स, तिएनपिंग, टेन्सेंट मूव्हीज, टेन्सेंट म्युझिक स्टुडिओ. २१ जानेवारी २०११ रोजी वीचॅट सुरू झाले. आज, २०२०मध्ये जगातील सर्वांत प्रभावी सोशल मीडिया अॅपपैकी एक असे स्थान या अॅपने मिळवले आहे. दर महिन्याला एक अब्जहून अधिक लोक वीचॅट वापरतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि गेमिंग वगळता, टेन्सेंटने जगात असंख्य ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. याची काही उदाहरणे आहेत – युनिव्हर्सल स्टुडिओ (१० टक्के), वूडू गेम्स, वॉर्नर म्युझिक ग्रुप (१.६ टक्के), स्पॉटिफाय (१० टक्के), तेल्साइंक (१५ टक्के).

अलिबाबा, पायतू आणि टेन्सेंट या तिन्ही कंपन्या चीनमधल्या इंटरनेटवर अधिराज्य गाजवतात आणि याचे एकमेव कारण म्हणजे चिनी जनतेचा आपल्या या कंपन्यांवर असलेला दृढ विश्वास. त्यामुळेच, गुगल, फेसबुक नसल्याचा फरक चिनी नागरिकांना जराही जाणवत नाही. त्याचबरोबर, चीन सरकारने उद्या गुगल व फेसबुक यांना देशात येण्याची परवानगी दिली तरी चिनी लोकांची मने जिंकणे त्यांना तितके सोपे नसेल, हेही तितकेच खरे. 

- सोहम काकडे
ई-मेल : soham.kakade@ewan.co.in

(लेखक पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि चिनी भाषेचे तज्ज्ञ आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HWUJCQ
Similar Posts
भारतात चीनची गुंतवणूक आहे तरी किती? चीनवर बहिष्कार हा जिव्हाळ्याचा विषय झाला आणि सामान्य नागरिक भावनेच्या भरत वाहवत गेला. आणि त्याने सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. चीनवर बंदी कधी आणणार? चिनी मालावर बंदी कधी घालणार? पण वस्तुस्थिती काय आहे? चीनची भारतातील गुंतवणूक कशी आणि किती आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहू या ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराच्या चौथ्या भागात
चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धात भारतासाठी संधी अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये भारत आंतरराष्ट्रीय दर्जा साध्य करून, उत्पादनांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून निर्यातीमध्ये चांगलीच वाढ करू शकतो. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धामध्ये भारतासाठी निश्चितच संधी दडलेल्या आहेत. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १३वा भाग..
भारत-चीन संबंध : भावनिक नको, ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन हवा ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा २०वा म्हणजेच अंतिम भाग.....
चीनचा नवा विस्तारवाद – वन बेल्ट वन रोड शी जिनपिंग नोव्हेंबर २०१२मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि लगेचच मार्च २०१३मध्ये ते चीनचे अध्यक्ष झाले. चीन आधीपासूनच पाहत असलेले विस्तारवादाचे स्वप्न जिनपिंग अध्यक्ष झाल्यानंतर आणखी गडद झाले. त्याबरोबरच, आणखी महत्त्वाकांक्षी स्वप्ने व भौतिक विस्तारवाद साकारण्याचीही तयारी सुरू झाली. ही तयारी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language